मग पश्चाताप करू नका

तुम्ही गरीब आहात.

तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळत नाही.

तुमच्याकडे पुस्तके विकत घेण्यासाठी पैसे नाही.

तुमच्याकडे क्लासला जॉईन करण्यासाठी शहर जवळ नाही.

क्लासची फी भरायला तुमच्याकडे पैसे नाही.

कामाने इतके थकून जाता की अभ्यासासाठी मुड राहत नाही.

इतक्या परीक्षा दिल्या आता की अभ्यासाची इच्छाच राहिली नाही.

आणखी बरेच काय काय असेल.

हे विचार तुमच्या पण डोक्यात येत असेल तर मी एकच सांगतो.

सोडून द्या

नवीन जाहिरात कोणती आली ते बघणे सोडून द्या.

जागा किती आहेत हे बघणे सोडून द्या.

कोणते मिरीट किती वर क्लोज झाले हे बघणे सोडून द्या.

फॉर्म भरणे सोडून द्या.

परीक्षा देणे सोडून द्या.

मनात कुठेतरी असणारी इच्छा दाबून टाका.

जे चालू आहे तेच चालू द्या. 

बदल करण्याचे स्वप्न सोडून द्या.

तुमच्या स्वप्नांना अनाथ करा. पुन्हा त्यांच्याकडे वळूनही बघू नका.

सोडून द्या हे सर्व काही.

सोडून देणे खूप सोप्प आहे – चालू ठेवणं खूप अवघड आहे.

म्हणून आज बाजारात नवीन उघडणारे दुकाने भरपूर दिसतात – मधेच बंद पडणारे दुकानेही भरपूर दिसतात. परंतु दहा/वीस वर्षापासून चालू असणारी दुकानं खूपच कमी दिसतात.

कारण सोडून देणे सोप आहे चालू ठेवणे अवघड आहे.

आणि सर्वात शेवटी हे सर्व करत असताना एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा – ज्यावेळी झोपताना एकटे असाल किंवा एखाद्या निवांत ठिकाणी एकटे असाल त्यावेळी – ** पश्चाताप करू नका ** 

हे सर्व सोडून देऊन जर तुम्हाला पश्चाताप होत नसेल तर नक्की सोडून द्या.

हे सर्व सोडून जर तुमचे मन तुम्हाला खात नसेल तर नक्की सोडून द्या.

हे सर्व सोडून तुम्हाला निवांत झोप लागत असेल तर नक्की सोडून द्या.

पण

मात्र कधीही यापुढे आयुष्यात 

एखाद्याच्या कडक वर्दीकडे बघून ‘ या जागी मी सुद्धा असतो ‘ असा विचार करू नका.

‘ अजून लढलो असतो तर नक्कीच भरती झालो असतो ‘ हे वाक्य भविष्यात कधीही बोलू नका.

‘ दोनच मार्गांनी हुकलो – नाहीतर पोस्ट मिळालीच होती ‘ – हे कोणालाच सांगू नका. 

कारण यामध्ये पश्चाताप आहे. 

तुमचा अभ्यास सुरू ठेवायचा की बंद करायचा – हे तुम्हाला सध्या ठरवायला कठीण जात असेल.

कारण काही ठिकाणी खूप जास्त मिरीट लागले आहे.

तुम्ही भरपूर अभ्यास करूनही मागे पडले आहात.

यापुढे तुमच्याने होणार नाही असे तुम्हाला वाटत आहे.

हे सर्व विचार करत असताना आता भरती बंद की अजून एक प्रयत्न करायचा हा संभ्रम मनात निर्माण होत असेल.

त्यासाठी एकच करायचे.

स्वतःला एकच प्रश्न विचारा – 

‘ मी आज सोडून दिले तर मला भविष्यात पश्चाताप होईल का? ‘

आणि तुमचे मन जर म्हणत असेल – हो मला पश्चाताप होईल. तर मित्रांनो लक्षात घ्या अभ्यास सुरू ठेवा. 

स्वतःचेच मन स्वतःला खायला लागणे – हे खूप मोठे दुःख आहे.

भविष्यात दुसर्‍याची वर्दी बघून – तुम्हाला दुःख होणार असेल तर अभ्यास सुरू ठेवा.

भविष्यात स्वतःची परिस्थिती बघून – तुम्हाला पश्चाताप होत असेल तर प्रयत्न सुरू ठेवा.

भविष्यात आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले नाही – ही जखम अशीच ओली राहणार असेल तर रक्ताचं पाणी करुन पुन्हा लढा.

लक्ष द्या सोडून देणं सोप आहे – म्हणून आज खूप लोकं सोडून देतील.

तुम्ही सोडू नका – कारण आता तर खरी गर्दी कमी होणार आहे.

दहापैकी नऊ किलोमीटर पळणारे भरपूर होते – शेवटच्या एका किलोमीटरसाठी पळणारे तुम्ही खूप थोडे आहात.

तुमची जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत. 

तुम्ही फक्त लढण्याची तयारी ठेवा – तुमच्या तयारीला जिद्दीत रूपांतर करण्याचे काम मी करतो आहे. 

जय हिंद मित्रांनो..

मी सागर सर.. आणि तुमचे पोस्टचे स्वप्न पूर्ण करणं हे माझे स्वप्न !! 

लढत रहा पडत रहा आणि जोपर्यंत पोस्ट मिळत नाही तोपर्यंत परिस्थितीसमोर दंड थोपटत म्हणत रहा – ‘ **मी पोस्ट मिळणारच आणि सर्वांची जिरवणारच** ‘ 

एक दिवस तुमचा पराक्रम – तुमची पोस्ट तुमच्यासाठी खेचून आणेल. स्वतःवर विश्वास ठेवा.

14 thoughts on “मग पश्चाताप करू नका”

  1. mi khup negetive jhale hote sir but ha lekha vachun kuthari as vthat punha ekda ladhav thank you sir

  2. दादा…. मन सांगता परत प्रयत्न कर……. ♥ खूप चांगलं मार्गदर्शन… दिल….. ♥ येईल कि आपला पण दिवस… वर्दी मध्ये

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!